निफाड तालुक्यातील सोनेवाडी खुर्द ठरले पहिले ‘ऑनलाईन रेशनकार्ड गाव’ महसूल समाधान शिबीर अभियानातून डिजिटल पारदर्शकतेकडे महत्त्वाचे पाऊल



प्रतिनिधी. -‘ गणेश ठाकरे लासलगाव 

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत निफाड तालुक्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून, सोनेवाडी खुर्द हे गाव तालुक्यातील पहिले ‘ऑनलाईन रेशनकार्ड गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शिधापत्रिका धारकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा उपलब्ध होणार आहेत.

    दुर्गामाता महिला बचत गट येथील रास्तभाव दुकानाचा परवानाधारक असून, गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. शिधापत्रिकांची ऑनलाईन नोंदणी, आधार संलग्नता आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली आहे. गावात एकूण १११ शिधापत्रिकाधारक असून, त्यामध्ये एकूण ४५ सदस्य असलेल्या १२ अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका आणि ३७८ सदस्य संख्या असलेल्या ९९ प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका यांचा समावेश आहे. गावात एकूण लाभार्थी सदस्य संख्या ४२३ इतकी आहे. या सर्व लाभार्थ्यांना आता अंगठ्याच्या ठशावर धान्य वितरण करण्यात येत असून, धान्य मिळाल्यानंतर त्वरित एसएमएसद्वारे माहिती प्राप्त होत आहे.

     डिजिटल युगात ई - शिधापत्रिका हे स्मार्ट रेशन कार्डच्या दिशेने पहिले पाऊल ठरत आहे. या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता वाढली असून, धान्य वितरणाची नोंद रिअल - टाइम पद्धतीने होत असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. माहिती अद्ययावत करणे, नाव दुरुस्ती, सदस्य वाढवणे किंवा कमी करणे ही कामेही ऑनलाईन पद्धतीने सुलभ झाली आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी अतुल गायकवाड, पुरवठा निरीक्षक

उल्हास टर्ले यांनी समन्वय साधला. ग्रामस्थ, महिला बचत गट आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा डिजिटल बदल शक्य झाला आहे. 


सोनेवाडी खुर्दचे ‘ऑनलाईन रेशनकार्ड गाव’ म्हणून झालेले रूपांतर हे निफाड तालुक्यासाठी सकारात्मक पाऊल मानले जात असून, ग्रामीण भागात डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.

• डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढते आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होतो. सोनेवाडी खुर्दने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही या पद्धतीचा अवलंब करावा, अशी अपेक्षा आहे.--डॉ.शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, निफाड


• महसूल समाधान शिबीर अभियानाच्या माध्यमातून विविध सेवा गावपातळीवर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अनुषंगाने सोनेवाडी गावातील जुन्या, फाटलेल्या व जीर्ण शिधापत्रिका बदलून ई - शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. नागरिकांना या शिधापत्रिका आर.सी.एम.एस पोर्टलवरूनही डाउनलोड करता येतील. ई-शिधापत्रिका बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोनेवाडी गावात कॅम्प मोडवर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.--विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड