सायखेडा महाविद्यालयच्या भूगोल विभागाची कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रास प्रक्षेत्र भेट

 



प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 

राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांचे मार्गदर्शनाखाली कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी येथे रब्बी हंगामानिमित्त प्रक्षेत्र भेट व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. 

       या उपक्रमात मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित सायखेडा महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्रावरील विविध उपक्रमांची माहिती प्रत्यक्ष पाहणीद्वारे जाणून घेतली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान वरिष्ठ संशोधन सहाय्यक तथा क्षेत्र व्यवस्थापक डॉ.भरत मालुंजकर यांनी गव्हाच्या विविध जाती, त्यांची उपयुक्तता तसेच गहू पिकावर सुरू असलेल्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली. हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेतील उपकरणे व हवामान नोंदींची प्रक्रिया प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्यात आली. या भेटीत भूगोल विभागातील १५ विद्यार्थी व ३ प्राध्यापक सहभागी झाले होते. संशोधन केंद्रातील उपक्रमांची माहिती व प्रत्यक्ष प्रक्षेत्र पाहून विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य खालकर, उपप्राचार्य एस. व्ही. गोसावी आणि विभागप्रमुख डॉ. एस. डी. पगार यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.के.एस.गोपाळे, प्रा.आर. एन.नाठे व प्रा.पी. एस. भंडारे यांनी भेटीचे यशस्वी आयोजन केले. याप्रसंगी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. भालचंद्र म्हस्के, प्रभारी गहू विशेषज्ञ डॉ. निलेश मगर, गहू पैदासकार प्रा.संजय चितोडकर आदी उपस्थित होते.


• ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत संशोधनाची माहिती पोहोचावी, त्यातून संशोधक वृत्ती विकसित व्हावी व नव्या संशोधकांचा उदय व्हावा, यासाठी अशा शिवार फेरी व प्रक्षेत्र भेटींचे नियोजन मोठ्या प्रमाणावर करावे.--डॉ.भरत मालुंजकर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक तथा क्षेत्र व्यवस्थापक