प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
अशोक खरात या भोंदू बाबाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिडीत महिलेची ओळख कोणत्याही प्रकारे उघड होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन तपास पथकाकडून करण्यात आले आहे.
काही न्यूज चॅनल्सचे इन्स्टाग्राम हॅन्डल्स, युट्यूब न्यूज पोर्टल्स, ऑनलाईन न्यूज पोर्टल्स तसेच इतर सोशल मिडिया आधारित माध्यमांकडून पिडीत महिलेची ओळख उघड होण्याची शक्यता असलेले वृत्तांकन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. काही वृत्तांमध्ये पिडीत महिलेचा चेहरा ब्लर करून व्हिडीओ दाखविण्यात आला असला तरी तिचा पेहराव, अंगकाठी, उंची, हावभाव इत्यादी बाबींमुळे तिची ओळख परिचित व्यक्तींना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित पिडीत महिला व तिच्या कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ७२(१) अन्वये कोणत्याही पिडीत महिलेची ओळख उघड होईल असे कृत्य दखलपात्र गुन्हा मानला जातो. अशा प्रकारच्या वृत्तांकनामुळे पिडीत महिला व त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक ताण येत असून, इतर संभाव्य पिडीत महिला तक्रार करण्यापासून परावृत्त होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
तसेच काही सामाजिक संस्था व त्यांचे कार्यकर्ते पिडीत महिलेला किंवा तिच्या कुटुंबीयांना भेटून अथवा सार्वजनिक वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे ओळख उघड करत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही तपास पथकाने स्पष्ट केले आहे. तरी सर्व नागरिक, न्यूज चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील संपादक व प्रतिनिधींनी कोणत्याही पिडीत महिलेची किंवा तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन विशेष तपास पथक प्रमुख यांनी केले आहे. पिडीतेची ओळख उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
