४०० हून अधिक नागरिकांची तपासणी, सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेवाळे( प्रतिनिधी- रमेश सोनवणे )
R.D. फाउंडेशन पाचोरा व शकुंतलाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी शेवाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४०० हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेत लाभ घेतला.
शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण आरोग्य तपासणी, सल्लामसलत व जनजागृती करण्यात आली. शकुंतलाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. सिद्धांत तेली व डॉ. सोनालीताई तेली (इशान्वी क्लिनिक, शेवाळे) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले. तसेच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी शबाना तडवी, दीपाली चौधरी, समिशा ससाने व हीना तडवी यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.
यावेळी R.D. फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲड. रणजीत तडवी यांनी सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. रोहित ब्राह्मणे, सचिव मा. भिमराव खैरे व नगरसेवक तथा संस्थेचे संचालक मा. प्रवीण ब्राह्मणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सिद्धांत तेली व डॉ. सोनालीताई तेली यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शेवाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच लताताई भोसले, सामाजिक कार्यकर्ते नितीन भोसले, सुनिल पाटील, किरण पांडे, रज्जाक तडवी, साहेबराव तडवी, शरद पांडे, प्रवीण तडवी, समीर तडवी, मज्जीद तडवी, अनिस तडवी तसेच पत्रकार संतोष मोरे, सुरेश तडवी, दिनकर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरामुळे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
