;पाचोरा तालुक्यातील नराधमाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल*
पाचोरा (प्रतिनिधी):- पोटच्या चिमुकल्या मुलीला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पाचोरा येथे उघडकीस आली असून या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २३ वर्षीय पीडित महिला हिला संशयित आरोपी बाळू काळू राठोड (रा. कु-हाड तांडा, ता. पाचोरा) याने गाठले. आरोपीने पीडितेच्या मुलीला तिच्यापासून हिरावून घेतले आणि “तुझ्या मुलीचे काहीतरी बरे-वाईट करेन" अशी धमकी दिली. या धाकाखाली त्याने दि.१९/११/२०२५ रोजी दुपारी एक वाजता पीडितेला पाचोरा येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेला पुन्हा धमकावले की, “जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझी बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेन." या भीतीपोटी पीडितेला त्याने दि.२०/०१/२०२६ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील मिरजगाव येथील 'श्रीमंत हॉटेल'वर नेले आणि तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अखेर या त्रासाला कंटाळून विवाहित पीडितेने पाचोरा पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी बाळू काळू राठोड (रा.कुऱ्हाड तांडा तालुका पाचोरा)याच्याविरुद्ध गुरुन ४४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ६४,६४ (२), (m),११५ (२), ३५१ (२),(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करत आहेत.
