पहिल्यांदा भाजपच्या कमळाचे जिल्हा परिषदवर वर्चस्व




परभणीप्रतिनिधी :- रमेश मुलगीर

 

जिल्हा परिषद  व पंचायत समिती निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर झाला असून परभणी जिल्हा परिषदेत इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपाला एकूण २४ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शिवसेना, उबाठा, काँग्रेस यांची पिछेहाट झाली आहे.

जिल्हा परिषद पक्षीय बलाबलानुसार भाजप – २४, राष्ट्रवादी – १५, उबाठा – ६, शिवसेना – ५, काँग्रेस – ३ तर अपक्ष – १ अशी स्थिती असून एकूण ५४ जागांचा समावेश आहे. भाजपाला जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचे गणित भाजपाच्या बाजूने झुकले असल्याचे चित्र आहे.

परभणी जिल्हा परिषदेत यापूर्वी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. मात्र यावेळी भाजपने मोठी झेप घेत इतिहास रचला आहे. मागील निवडणुकीत भाजपाकडे कमी जागा होत्या, परंतु यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागांवर समाधान मानावे लागले असून उबाठा गटाला ६, शिवसेनेला ५ आणि काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. अपक्षांनी एक जागा जिंकली आहे. त्यामुळे शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान या निकालामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून आगामी काळात जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.