परभणी प्रतिनिधी :– रमेश मुलगीर
शेळगाव महाविष्णु (ता. सोनपेठ) महादेवाच्या भक्तीचा जागर करणाऱ्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सोनपेठ तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेळगाव महाविष्णु येथील श्री सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे. या महोत्सवानिमित्त ह.भ.प. प्रशांत महाराज तोरे यांची शिवमहापुराण कथा, कीर्तन सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन समस्त शेळगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा धार्मिक महोत्सव माघ कृष्ण अष्टमी, मंगळवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाला असून माघ अमावस्या, मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
या कालावधीत दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ श्रीविष्णु सहस्रनाम, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ गाथा पारायण, दुपारी १ ते ४ शिवमहापुराण कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ तर रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे.
या महोत्सवाच्या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. मंगळवार दि. १० फेब्रुवारी रोजी ह.भ.प. श्री भागवत महाराज नखाते, बुधवार श्रीगुरु महंत वासुदेवदास महाराज बैरागी, गुरुवार ह.भ.प. माधव महाराज कुरे, शुक्रवार ह.भ.प. सतीश महाराज सायखेडकर, शनिवार ह.भ.प. कुशल महाराज पुरी, रविवार ह.भ.प. राम महाराज पिंपळेकर, सोमवार ह.भ.प. सोमनाथ महाराज बदाले यांची कीर्तने होणार आहेत. मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी न्यायसाहित्य वेदांताचार्य ह.भ.प. प्रल्हाद शास्त्री दैठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
महाशिवरात्री महोत्सवात श्रीगुरु नंदिकेश्वर मठसंस्थान, सोनपेठ येथील मठाधिपती ष.ब्र. १०८ श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तसेच महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी दीपोत्सव, विशेष अभिषेक व रात्र जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व सूत्रसंचालन श्री महाविष्णु भजनी मंडळ, श्री महारुद्र भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून महोत्सव काळात दररोज सायंकाळी शिवमहापुराण कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवभक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त शेळगाव ग्रामस्थ व श्री सोमेश्वर मंदिर सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
