प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
मरळगोई - विंचूर रस्त्यावर दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला असून विद्यार्थ्यांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला असताना झुडपे तात्काळ हटवून मरळगोई चौफुलीवर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
मरळगोई ते विंचूर रस्त्यावर दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरून विंचूर व लासलगाव या मुख्य बाजारपेठेकडे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने वाहतूक सतत सुरू असते. मात्र रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे समोरून मोठे वाहन आल्यास दुसऱ्या वाहनाला मागेच थांबावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
लासलगाव व विंचूर येथील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशावेळी समोरून वाहन आल्यास विद्यार्थ्यांना अक्षरशः काटेरी झुडपात जावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत दुतर्फा वाढलेली झुडपे मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मरळगोई - विंचूर तसेच भरवस फाटा ते लासलगाव या रस्त्याचे अलीकडेच नूतनीकरण झाले आहे. मरळगोई चौफुलीवर यापूर्वी छोटे - मोठे अपघात घडलेले असल्याने त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
मोठ्या अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे हटवून मरळगोई चौफुलीवर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी शिवव्याख्याते चंद्रकांत आव्हाड तसेच मरळगोई पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
