उन्हाळी सुटीमुळे धावणार जादा बसेस, वाढत्या गर्दीबाबत केली उपाययोजना

अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

      १ मे मालेगाव: मुलांना सुटी लागलीय? गावाला जायचा प्लॅन करताय? मग तुमचा प्रवास आता सुलभ होणार कारण मालेगाव एसटी आगाराने उन्हाळी सुटीनिमित्त १ मे पासून ते १० जून पर्यंत जादा बसफेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

      उन्हाळी सुटीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज अतिरिक्त एसटी फेऱ्या चालवण्याचा निर्णय आगाराने घेतला आहे. याशिवाय नियमित फेऱ्यादेखील सुरूच राहणार आहेत. मात्र बस प्रवाशांच्या वाढत असलेल्या गर्दीच्या तुलनेत वाढीव फेऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

      उन्हाळी सुट्या लक्षात घेता, मालेगाव एसटी विभागाने देखील उन्हाळी विशेष एसटी बसचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. १ मे ते १० जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या गावांसह शहरांमध्ये एसटीच्या जादा बस धावणार आहेत. यामध्ये मालेगावहून पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्या असून, १० जूनपर्यंत या गाड्या धावणार आहेत. पणे. सोलापर. छत्रपती संभाजीनगर या भागात रोज विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली. सुटीनिमित्त पर्यटनस्थळे, देवस्थाने येथे जाण्याकडे प्रवाशांचा मोठा कल आहे, ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना तिकीट दरात सवलत मिळाल्याने प्रवासी संख्या वाढणार आहे. यामुळे उन्हाळी हंगामात गर्दी उसळण्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

       एसटी महामंडळाने उन्हाळी हंगामात जादा बसेसचे नियोजन केलेले आहेत तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेऊन एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यास सहकार्य करावे.

-अतुल लोढा, प्रवासी मित्र, मालेगाव