पुण्यामध्ये पहिले सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ कोणी केला या प्रश्नाचे उत्तर आहे सार्वजनिक काका यांनी. हे आठवण्याचे कारण म्हणजे या पहिल्या हळदीकुंकू समारंभाला मंगळवारी (१८ एप्रिल) चक्क दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. हा योग साधून पहिले हळदीकुंकू झाले त्याच ठिकाणी म्हणजे बाजीराव रस्त्यावरील नवा विष्णू मंदिरात इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने हळदीकुंकू आयोजित करून सायंकाळी शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला जात आहे.
इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींचे वेगवेगळ्या प्रकारे स्मरण केले जाते. दीडशे वर्षांपूर्वी पुण्यात घडलेली एक घटना सर्व महाराष्ट्रात गाजली होती. ती म्हणजे महिलांचे सार्वजनिक हळदीकुंकू ! पुणे सार्वजनिक सभेचे नेते गणेश वासुदेव जोशी यांना ‘सार्वजनिक काका’ याच नावाने लोक ओळखत असत. त्यांनी ‘स्त्री विचारवती सभा’ यांच्या पुढाकाराने सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्या काळात पाच हजार महिला उपस्थित होत्या. त्याची बातमी मुंबई च्या नेटिव्ह ओपिनियन मध्ये छापून आली होती. हा कार्यक्रम बाजीराव रस्त्यावरील नवा विष्णू मंदिरात चैत्र वद्य त्रयोदशीला (२५ एप्रिल १८७३) झाला होता. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी २० वर्षे आधी घडलेली ही घटना त्या काळातील एक क्रांतिकारी आणि महाराष्ट्राला प्रागतिक घडवणारी घटना ठरली.