सुर्यकांत बडबे खेड (रत्नागिरी ) प्रतिनिधी
कोकणच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व सुनील भगवान शिंदे (वय ५०) यांचे दीर्घ आजाराने गुरूवार दि.२० रोजी दुपारी.२.३० वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील चाकाळे येथील निवासस्थानी निधन झाले.
मास्टर सुनील शिंदे हे नाव संपूर्ण कोकणाला सुपरिचित होते. कराटे, तायकोंदो, पिंचक सिल्याट आदी विविध मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट पदव्या त्यांनी मिळवल्या. जपान व कोरिया येथील तज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा आदी भागात प्रशिक्षण व खेळाचा प्रचार प्रसार त्यांनी केला. भारतात विविध ठिकाणी जाऊन शेकडो राष्ट्रीय, राज्य खेळाडू घडवले. राज्य शासनाच्यावतीने रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी कोकण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. जिल्हा प्रशासनाने पुरातून उडी मारून वीस पेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवला म्हणून त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला होता. खेड येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक खेळांच्या संघटना उभ्या करून त्या खेळांना प्रोत्साहन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुनील शिंदे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वच तालुक्यात कार्यरत व्यक्ती, नातेवाईक व विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत खेडमधील पालिकेच्या स्मशानभूमीत श्री शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांना मार्शल आर्ट क्षेत्रातील उपस्थित खेळाडूंनी यावेळी पारंपरिक पद्धतीने मानवंदना दिली.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई, दोन भाऊ, जावई असा परिवार आहे.