उदगीर/प्रतिनिधी
उदगीर येथील अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समिती आणि लसाकमच्या वतीने क्रांतीपिता महात्मा फुले यांची १९६ वी जयंती अँड विष्णू लांडगे लाॅ चेंबर्स येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतीपिता महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र नामवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शिवाजी देवनाळे,प्रा.बालाजी कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रा.शिवाजी देवनाळे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर विचार मांडताना म्हणाले की, महात्मा फुले हे सत्यशोधक, समतावादी विचारांचे होते त्यांनी सांगितलेल्या विचार वाटेने गेले पाहिजे.महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे बहुजनांचा उध्दार झाला. डाॅ.बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना आपले गुरू मानले असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
प्रा.बालाजी कांबळे विचार व्यक्त करताना म्हणाले की, महात्मा फुले यांनी सकल बहुजनांना डोळस बनविण्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.त्या महापुरुषांचा पुतळा उदगीर शहरांमध्ये नाही अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना हरिश्चंद्र नामवाड म्हणाले की, महापुरुषांच्या जयंत्या समाज संघटीत करण्यासाठी असतात.सकल बहुजन समाजाशी माणुसकीचे नाते संबंध जपण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असते.महात्मा फुलेंचा पुतळा उदगीर शहरांमध्ये बसविण्यासाठी नगरपालिकेला सर्व मिळून निवेदन देण्याचे आवाहन ही यावेळी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.रामभाऊ कांबळे, प्राचार्य गोविंद भालेराव बाबुराव रणदिवे,दिलीप खादीवाले, अँड विष्णू लांडगे विशाल सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.यावेळी प्रा.आर.एम.महाजन,तानाजी काकडे हेही उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केले तर आभार लसाकम तालुकाध्यक्ष प्रल्हाद येवरीकर यांनी मानले.