वाढत्या तापमानामुळे खेडलेझुंगे, कोळगाव परिसरातील फळबागा धोक्यात

 



डाळिंब-पेरू बागांसाठी शेडनेटचा आधार;लाखो रुपयांच्या अतिरिक्त खर्चाने शेतकरी चिंतेत

प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद व सारोळेथडी परिसरातील फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या तापमानामुळे डाळिंब व पेरूच्या बागांतील कोवळ्या फळांना उन्हाचा चटका बसत असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करून शेडनेटचे संरक्षण कवच उभारावे लागत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.

         परिसरातील शेतकरी विविध प्रयोगशील शेती करत फळबागांकडे वळले आहेत. मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब, पेरू आदी फळपिकांची लागवड करून चांगले उत्पादन घेतले. मात्र, यंदा ऐन फुलधारणा व फळधारणेच्या काळात झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेली उष्णता यामुळे फळबागा संकटात सापडल्या आहेत.

कडक उन्हामुळे फळांची त्वचा करपणे, फळे सडणे, झाडांची पाने गळणे आणि उत्पादनावर परिणाम होणे अशा समस्या निर्माण होत आहेत. या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शेतकरी संपूर्ण बागा पांढऱ्या शेडनेटने झाकत आहेत. बांबू उभारणे, तारा ओढणे व शेडनेट खरेदी करणे यासाठी मोठा खर्च करावा लागत असून अनेक शेतकरी कर्ज काढून हा खर्च भागवत आहेत. शासनाकडून फळबागांसाठी शेडनेट अथवा क्रॉप कव्हरवर कोणतेही विशेष अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने क्रॉप कव्हरसाठी अनुदान योजना राबवावी, अशी मागणी बागायतदारांकडून होत आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा काढण्याचे आवाहन केले जात असले तरी नुकसान झाल्यानंतरही विम्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी विमा योजनांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.

   निफाड तालुक्यात २४ ते ३० मे दरम्यान कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. दुपारच्या वेळी वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बागांमधील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून ३० मे रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पुढील काही दिवसही उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

• शेती निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढते दर आणि कडक उन्हामुळे फळशेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. बागा वाचवण्यासाठी शेडनेटचा मोठा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. डाळिंबाला किमान १५० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्यासच खर्च भरून निघेल. अन्यथा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.रमेश घोटेकर, शेतकरी, खेडलेझुंगे

• फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने क्रॉप कव्हर किंवा शेडनेटसाठी अनुदान देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल.--श्रीराम घोटेकर,डाळिंब उत्पादक शेतकरी, खेडलेझुंगे