पत्रकार / गणेश ठाकरे, लासलगाव
आज संकष्टी चतुर्थीच्या मंगल पर्वावर, येथील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर - ट्रस्ट आणि श्री अहिल्यादेवी मित्र मंडळ यांच्या वतीने एका भव्य 'आंबा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. लासलगावच्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी तब्बल २५१ किलो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली असून, भक्ती आणि फळांच्या राजाचा गोडवा यांचा एक अनोखा संगम येथे पाहायला मिळत आहे.
संकष्टी चतुर्थी म्हणजे गणेश भक्तांसाठी पर्वणीच. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. बाप्पाच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली आंब्यांची सजावट हे आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे. आंब्यांच्या नैसर्गिक सुवासाने संपूर्ण मंदिर परिसर दरवळून निघाला असून, बाप्पाचे दर्शन घेताना भक्तांना एक वेगळीच प्रसन्नता लाभत आहे.
२५१ किलो आंब्यांची आरास भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून मोठ्या प्रमाणात आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.या भव्य सजावटीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.आंबा महोत्सवाच्या माध्यमातून भक्तीची गोडी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्ट आणि अहिल्यादेवी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष सोहळा आयोजित केला आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या महोत्सवाचा आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
