वृत्तसेवा / गणेश ठाकरे लासलगाव :-
जीवन कधी कधी इतके कठोर वळण घेते की, स्वप्नांची वाटच अंधारात हरवून जाते… पण काही जिद्दी माणसं असतात, जी त्या अंधारातच स्वतःचा प्रकाश निर्माण करतात. मौजे सुकेने येथील निलम दिनकर निकम (जाधव) ही अशीच एक संघर्षकन्या… नियतीने दिलेल्या दुःखाला सामोरं जात तिने स्वतःचं आयुष्य नव्याने घडवलं आणि प्रथमवर्ग दिवाणी न्यायाधीशपदी भरारी घेत अनेकांसाठी प्रेरणेचा दीप बनली.
१५ मे १९८९ रोजी एका साध्या कुटुंबात जन्मलेली निलम… बालपणापासून साधेपणात वाढली. गावातील शाळेतच तिचं शिक्षण झालं. आयुष्य शांतपणे पुढे जात असतानाच २०१२ मध्ये तिचं लग्न झालं आणि सुखी संसाराची स्वप्नं डोळ्यात घेऊन ती नव्या आयुष्याकडे वळली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं… लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच तिच्या पतीचं निधन झालं. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त झालं… स्वप्नं तुटली… आणि जगण्याचं कारणच हरवल्यासारखं वाटलं.
पण अशा वेळी निलमने हार मानली नाही. दुःखाला कवटाळून बसण्याऐवजी तिने त्याच दुःखाला शक्ती बनवलं. पतीचं न्यायाधीश होण्याचं अपूर्ण स्वप्न तिने स्वतःचं ध्येय बनवलं. घरातील जबाबदाऱ्या, समाजाच्या नजरा आणि मनातील वेदना यांचा सामना करत तिने पुन्हा शिक्षणाचा मार्ग धरला. बी.ए., बी.एड. पूर्ण करत तिने एल.एल.बी. चा अभ्यासक्रमही पूर्ण केला.
निफाड न्यायालयात वकिली करताना तिने दिवस-रात्र परिश्रम केले. न्यायालयातील प्रत्येक केस, प्रत्येक अनुभव तिच्यासाठी शिकण्याचा टप्पा बनला. आठ वर्षांची वकिली… संघर्षाचा दीर्घ प्रवास… पण तिच्या मनात एकच स्वप्न न्यायाधीश होण्याचं.
अखेर तिच्या जिद्दीने इतिहास घडवला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथमवर्ग दिवाणी न्यायाधीश परीक्षेत तिने उल्लेखनीय यश मिळवलं. मुंबई उच्च न्यायालयातील मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरी जात तिने यशाची गवसणी घातली. हा केवळ निकाल नव्हता… हा तिच्या अश्रूंना मिळालेला न्याय होता… तिच्या संघर्षाला मिळालेलं सोनं होतं.
या प्रवासात तिच्या आई-वडिलांची, भावाची आणि सासऱ्यांची मिळालेली साथ तिच्यासाठी आधारस्तंभ ठरली. त्यांच्या विश्वासानेच ती खंबीर उभी राहिली. नियतीने दिलेल्या जखमा विसरून स्वतःच्या आत्मबळावर उभं राहणं म्हणजे काय… हे निलम निकम यांनी दाखवून दिलं.
आज त्या न्यायाधीश झाल्या… पण त्याहून मोठं म्हणजे त्या हजारो मुलींसाठी आशेचं प्रतीक बनल्या. संकट कितीही मोठं असलं तरी जिद्द, चिकाटी आणि कष्ट यांच्या बळावर स्वप्नं पूर्ण करता येतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे निलम निकम.
संघर्षाच्या राखेतून उभी राहिलेली ही न्यायाची ज्योत… अनेकांच्या आयुष्याला दिशा देत राहो ह्याच सदिच्छा.
नीलमला या संघर्षमय प्रवासात तिची आई कल्पना निकम, वडील दिनकर निकम, भाऊ नितीन (लालु) निकम, सासरे अँड. के.बी जाधव यांची खंबीर साथ मिळाली. नियतीने दिलेल्या जखमांपेक्षा कष्टाने मिळवलेले यश समाधानकारक असते हे सिद्ध करत स्वतःच्या आत्मबळावर न्यायाधीश होऊन अँड.निलम (जाधव) निकमने इतर महिला व मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे, हे मात्र नक्की. तिच्या या यशाबद्दल निफाडचे माजी आमदार अनिल (आण्णा) कदम, वकील संघाचे अध्यक्ष अँड.प्रवीण ठाकरे, उपाध्यक्ष अँड.बी.के जंगम, सरकारी अभियोक्ता अँड.रामनाथ शिंदे, ॲड. के के शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, बाजार समिती संचालक गोकुळ गीते, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, उद्योजक अमोल भालेराव, अँड.संदीप पवार, अँड.विजय मोगल, अँड.नवले, दिपक पगार, दत्तू भुसारे, सागर जाधव, रावसाहेब (आप्पा) राजोळे यांच्यासह निफाड वकील संघाने विशेष अभिनंदन केले आहे.
वकील असलेल्या पतीचे न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या निधनानंतर न्यायाधीश होण्याचा ध्यास घेतला. ८ वर्ष निफाड न्यायालयात वकिली करतांना सर्वांनी मार्गदर्शन करत न्यायाधीश होण्याची प्रेरणा दिली. तसेच या संघर्षाच्या काळात मला आई, वडील, भाऊ, सासरे यांची खंबीर साथ मिळाल्यानेच मी न्यायाधीश होण्याचे स्वप्न साकार करू शकले. निःपक्ष न्यायदानाच्या माध्यमातून लोकसेवेची संधी नियतीने मला दिली आहे. या संधीचे भविष्यात नक्कीच सोने करील.
