लासलगाव बाजार समितीची बदनामी थांबवा - सभापती डी.के.जगताप



 प्रतिनिधी  :-  गणेश ठाकरे लासलगाव

लासलगाव येथील व्यापारी संघटनेच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावरून अलीकडे नव्या व जुन्या व्यापाऱ्यांमध्ये उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रसारमाध्यमांमध्ये लासलगाव बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीच्या, एकांगी व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असून अशा प्रकारे बाजार समितीची बदनामी तात्काळ थांबवावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप व उपसभापती संदीप दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

       यावेळी जगताप यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा, विक्रीसाठी सुलभ व पारदर्शक व्यवस्था उपलब्ध व्हावी, आर्थिक फसवणूक व पिळवणूक टाळली जावी, तसेच चोख वजनमाप व वेळेत देयके मिळावीत या उद्देशाने राज्यात कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दि.१ एप्रिल १९४७ रोजी स्थापन झालेली लासलगाव बाजार समिती आजतागायत शेतकरी व इतर बाजार घटकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे.

       बाजार समितीतील पारदर्शक लिलाव पद्धती, चोख वजनमाप व चोवीस तासांच्या आत रोख अथवा ऑनलाइन देयक अदा करण्याच्या विश्वासार्ह व्यवस्थेमुळे नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आदी जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतीमाल विक्रीसाठी येथे आणतात. आशिया खंडात कांद्याच्या बाजारासाठी ओळख असलेल्या या समितीत भुसार, तेलबिया, टोमॅटो, डाळींब, द्राक्षे व भाजीपाला यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. बाजार समितीत 'उघड व स्पर्धात्मक लिलाव' ही पद्धत काटेकोरपणे राबविली जाते. गेटपासद्वारे वाहनांची नोंद, क्रमवार लिलाव, अधिकृत लिलाव पुकारणाऱ्यांकडून बोली जाहीर करणे, तीनवार अंतिम घोषणा, लिलावावेळी सौदे नोंद व लिलावानंतर अधिकृत सौदापट्टी याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडते. लिलावानंतर बाजार समितीच्या डिजिटल भुईकाट्यांवर विनामूल्य वजनमाप करून शेतकऱ्यांना काटापट्टी दिली जाते. शेतकरी हितासाठी बाजार समितीने वाहनतळांचे काँक्रीटीकरण, स्वच्छ पिण्याचे पाणी, भोजन व निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, अल्प व्याजदरात तारण कर्ज, खत विक्री, रुग्णवाहिका, वैकुंठ रथ आदी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

    दि.१३ एप्रिल २०२६ रोजी काही नवीन परवानाधारक व्यापाऱ्यांनी पूर्वसूचना न देता थेट लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतल्यामुळे काही जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकला. परिणामी काही काळ लिलाव प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. बाजार समितीने तत्काळ दोन्ही पक्षांची बैठक घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला व लिलाव पुन्हा सुरू करण्यासाठी निर्देश दिले. तथापि, काही व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती तात्पुरती तणावपूर्ण झाली व शेतकरी वर्गाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे व लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवणे या दृष्टीने बाजार समितीने तात्पुरता निर्णय घेतला. यात कोणत्याही नवीन व्यापाऱ्यांना विरोध करण्याचा बाजार समितीचा हेतू नव्हता व नाही. उलट स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळावा, हीच बाजार समितीची भूमिका आहे.

   प्रसारमाध्यमांमध्ये नवीन व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळत असल्याचे चित्र रंगविण्यात आले आहे; मात्र वस्तुस्थिती अशी की, त्या दिवशी नवीन व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या ५९ शेतकऱ्यांपैकी केवळ एका शेतकऱ्याच्या ७ क्विंटल ७० किलो सोयाबीनला रु.५,८०० हा उच्चांकी दर मिळाला, तर उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन सरासरी रु. ४,९७३ या दराने विक्री झाले. दुपारच्या सत्रात जुन्या व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या २२ शेतकऱ्यांच्या ८७ क्विंटल ७५ किलो सोयाबीनपैकी एका शेतकऱ्याच्या ९ क्विंटल ४० किलो सोयाबीनला रु.५,८०० हाच उच्चांकी दर मिळाला, तर उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन सरासरी रु.५,३९२ या दराने विक्री झाले. त्यामुळे अशा बातम्या तथ्यहीन असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत.

तसेच 'खाणाखुणांवर भाव ठरवला जातो' या आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, लिलाव प्रक्रियेत तोंडी बोलीसोबत हातवारे किंवा संकेतांचा वापर हा पारंपरिक पद्धतीचा भाग आहे. मात्र अंतिम दर हा नेहमी स्पर्धात्मक बोलीद्वारेच निश्चित केला जातो व अधिकृतरीत्या नोंदविला जातो.

    लासलगाव बाजार समिती ही राज्यातील अग्रगण्य बाजार समिती असून तिच्या बाजारभावावर राज्यातील इतर बाजारांचे दर ठरतात. त्यामुळे कोणतीही पडताळणी न करता प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे बाजार समितीची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीची खातरजमा करूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात व बाजार समितीची बदनामी थांबवावी, असे आवाहन जगताप यांनी केले.


   शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये सलग तीन वर्षे अव्वल स्थान पटकावलेली लासलगाव बाजार समिती ही शेतकरी विश्वासाचे प्रतीक आहे. जवळपास सहा जिल्ह्यांतील शेतकरी येथे प्राधान्याने शेतीमाल विक्रीसाठी येतात. अशा पारदर्शक व विश्वासार्ह कामकाज असलेल्या बाजार समितीवर केवळ दोन व्यापाऱ्यांच्या मुद्द्यावरून करण्यात येणारी टीका ही वस्तुस्थितीपासून दूर आहे. काही घटकांकडून जाणीवपूर्वक बाजार समितीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून असे षडयंत्र तात्काळ थांबवावे; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- डी.के.जगताप, सभापती, कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगाव

* विविध प्रसारमाध्यमांतून सातत्याने लासलगाव बाजार समितीची होत असलेली बदनामी ही निषेधार्ह बाब आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून उभी राहिलेली ही ७९ वर्षांची विश्वासार्ह संस्था असून आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचे पैसे बुडालेले नाहीत. काही अपप्रवृत्ती खाजगी बाजार व्यवस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी बाजार समित्यांची जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत.- जयदत्त होळकर,सदस्य, कृषि उत्पन्न बाजार समिती


* पर्यायी विक्री व्यवस्थांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. सहकारी बाजार समित्यांमधील चोख वजनमाप, वेळेत देयक व अधिकृत व्यवहार ही शेतकऱ्यांसाठी सुरक्षित हमी आहे. तरीही काही घटकांकडून बदनामी करून खाजगीकरणाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न होत आहे.- ललित दरेकर, उपसभापती

* लासलगाव मुख्य बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री करणारे सर्व व्यापारी हे मर्चंट्स असोसिएशनचे सभासद आहेत. नवीन सभासद नोंदणी नियमानुसार होते. सध्या काही अर्ज प्रलंबित असून त्यावर कार्यकारिणी बैठकीत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत लिलाव प्रक्रिया बाधित करू नये.- प्रवीण कदम, व्यापारी सदस्य