निफाड तालुक्यात आशा व गटप्रवर्तकांवर  निवडणूक विषयक कामकाज सक्ती थांबवण्याची निवेदनाद्वारे आयटकची मागणी

  


प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव 


 निफाड तालुक्यातील आरोग्य विभागात कार्यरत आशा सेविका व गटप्रवर्तकांवर निवडणूक विषयक कामकाज सक्ती करू नये, या मागणीसाठी निफाडचे प्रांताधिकारी, तहसिलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

     निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आशा सेविका या आधीच माता - बाल आरोग्य, लसीकरण, कुपोषण प्रतिबंध, सर्वेक्षण व जनजागृतीसह सुमारे ७८ प्रकारच्या महत्त्वाच्या आरोग्य सेवांची जबाबदारी पार पाडत आहेत. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामीण व नागरी भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना निवडणूक विषयक कामकाजाची जबाबदारी देऊ नये, त्यांना निवडणूक कामकाजापासून दूर ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे स्पष्ट असतानाही निफाड तालुक्यात काही ठिकाणी त्यांच्यावर निवडणूक विषयक जबाबदारी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. आशा स्वयंसेविका या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेवांसाठी प्रशिक्षित असून त्यांना कामावर आधारित मानधन दिले जाते. बहुतांश आशा सेविकांकडे निवडणूक विषयक कामासाठी आवश्यक डिजिटल साधने, ॲप्स व प्रशिक्षण उपलब्ध नसल्यामुळे हे काम प्रभावीपणे करणे शक्य नाही. गटप्रवर्तकांवरही मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असून एका गटप्रवर्तकाला सुमारे २५ आशांचे समन्वयन, अहवाल तयार करणे तसेच गावोगावी भेटी देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांच्यावरही अतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी काम लादू नये, आशा व गटप्रवर्तकांना केंद्र सरकारकडून मागील चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून ते तात्काळ देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन निफाडचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसिलदार विशाल नाईकवाडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

     या प्रसंगी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ.राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली प्रीती नाईक, वर्षा गांगुर्डे, संगिता जाधव, वर्षा निखाडे, रेखा मोरे, भीमा पाटील, स्वाती देशमुख, स्वाती वाघ, सुनीता एखे, सरला बरसे, माया गायकवाड, सुनंदा बर्डे, चैताली कावळे, रोहिणी कदम, वैशाली जाधव, संगीता गाडे आदी उपस्थित होते.