; सुनांनी माहेरचा दाखला तयार ठेवावा, अफवांपासून सावध राहा प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांचे आवाहन
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर होणार असून त्यासाठी पूर्वतयारीला वेग आला आहे. विशेष सखोल पुनरिक्षणाच्या पार्श्वभूमीवर 119 येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
या प्रक्रियेत सन २०२४ मधील मतदार यादीतील नावे सन २००२ च्या मतदार यादीशी मॅप करण्याचे काम सुरू आहे. ज्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत आढळत नाहीत, त्यांचे नाव आई - वडील किंवा आजी - आजोबा यांच्या नावाशी जोडून पडताळणी केली जाणार आहे. संबंधित माहिती उपलब्ध नसल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत.
गृहभेटीदरम्यान मतदारांच्या मूळ रहिवासाचे राज्य, जिल्हा, तालुका व गाव याबाबत तपशील घेतला जाणार आहे. विशेषतः विवाहानंतर इतरत्र स्थायिक झालेल्या महिलांच्या बाबतीत त्यांच्या माहेरच्या कुटुंबाची सन २००२ मधील मतदार यादीतील नोंद कोणत्या मतदारसंघात होती, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे संबंधित महिलांनी माहेरचा दाखला तसेच आई - वडिलांची माहिती तयार ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रक्रियेसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा eci.net या ॲपच्या माध्यमातून सन २००२ मधील नाव शोधून मॅपिंग केले जाणार आहे. ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत सापडत नाही किंवा आवश्यक पुरावे सादर करता येत नाहीत, त्यांच्या नावाबाबत पुढील पडताळणी केली जाणार असून कोणत्याही मतदाराचे नाव संबंधितांशी संपर्क साधल्याशिवाय यादीतून वगळले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदार मॅपिंगचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी बीएलओना जबाबदारी देण्यात आली आहे. नागरिकांना माहिती मिळावी यासाठी क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी हा कोड स्कॅन करून सन २००२ मधील आपले नाव तपासावे. सुनांच्या बाबतीत आई - वडिलांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, मूळ गाव, तालुका व जिल्हा, संबंधित विधानसभा मतदारसंघ तसेच मतदार यादीतील क्रमांक यासह तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार २००२ पूर्वीची मतदार यादी, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, शासकीय ओळखपत्र आदी कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते.
ही प्रक्रिया दि.31 मार्सुच 2026 पर्यंत सुरू राहणार असल्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया मार्च २०२६ नंतरही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
