अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कन्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य
प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
जागतिक स्तरावर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणारी ३ एम आणि त्यांचा नामांकित ब्रँड स्कॉच ब्राईट यांच्या वतीने देण्यात येणारी ‘३एम - स्कॉच - ब्राइट मुलींसाठी शिष्यवृत्ती २०२५-२६’ चा मान निफाड तालुक्यातील चाटोरी परिसरातील गुणवंत विद्यार्थिनींनी पटकावला आहे.
घरची आर्थिक ओढाताण आणि वडील अल्पभूधारक शेतकरी असतानाही जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या या विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला आता मोठा आधार मिळाला आहे. नंदी फाउंडेशन संचलित ‘नन्ही कली’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन मुलाखतीत विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध करत अंतिम निवड मिळवली. चाटोरी येथील कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे जनता विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी श्रुती संपत खेलूकर हिला २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तसेच, सायखेडा येथील मविप्र कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आरती मधुकर खर्जूल व पल्लवी ज्ञानेश्वर शेलार या विद्यार्थिनींना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, पुढील शिक्षणासाठी मोठा हातभार लागणार आहे.
• ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे. योग्य संधी आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास त्या नक्कीच मोठे यश मिळवू शकतात. ‘३एम - स्कॉच - ब्राइट’ने दिलेला हा आधार अत्यंत मोलाचा असून, इतर कंपन्यांनीही अशा उपक्रमांद्वारे पुढे यावे.मंजुषा आहेर, मुख्याध्यापिका
• आई-वडील शेतात कष्ट करून आम्हाला शिकवत आहेत. वाढत्या खर्चामुळे शिक्षणाचा ताण जाणवत होता. या शिष्यवृत्तीमुळे तो काही अंशी हलका झाला असून, पुढे शिकण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.आरती खर्जूल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी
