परभणी (प्रतिनिधी) – रमेश मुलगीर
“परभणी महापालिकेवर आमचाच महापौर बसणार हे पहिल्या दिवसापासून पक्के होते. विरोधकांनी चंद्रपूरसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा, म्हणजेच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला; मात्र उद्धवसेना आणि काँग्रेसचा एकमेकांवरील विश्वास अभेद्य राहिला,” अशा शब्दांत उद्धवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
महापौर निवडीची प्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
‘मातोश्री’ भेटीवर स्पष्टीकरण
नगरसेवकांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना पाटील म्हणाले, “आमचे नगरसेवक कोणत्याही सहलीला गेले नव्हते. आम्ही त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि मार्गदर्शनासाठी घेऊन गेलो होतो. विरोधकांनी आमचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न केले, मात्र आम्ही तो डाव उधळून लावला.”आमचे परभणीचे नुतन महापौर सय्यद इकबाल व उप महापौर श्री गणेश देशमुख आज विराजमान झाले आहेत
राष्ट्रवादी आणि अपक्षांचाही पाठिंबा
या निवडणुकीत केवळ काँग्रेसच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच एका अपक्ष नगरसेवकानेही आमच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “यावरून विरोधकांकडे कोणताही जनाधार उरलेला नाही. त्यांनी आपला पराभव आता खिलाडूवृत्तीने मान्य करावा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
परभणीचा चेहरामोहरा बदलणार
सत्तेचा विजय साजरा करतानाच पाटील यांनी भविष्यातील आव्हानांची जाणीव करून दिली. “परभणीसमोर स्वच्छतेपासून ते ड्रेनेजपर्यंत अनेक मोठे प्रश्न आहेत. आमचे नूतन महापौर सय्यद इकबाल व उप महापौर श्री गणेश देशमुख यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणार आहोत पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल. परभणीत लवकरच मोठा बदल दिसेल आणि या क्रांतीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
