नगरदेवळा येथे मुंबई पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न;सुदैवाने जीवित हानी टळली

 


* आई-लेकिसह शेजारच्यांनी  विझवली आग.

* नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आले आरोपी.

* सीसीटीव्हीत दोन अज्ञात दुचाकीस्वार कैद.


नगरदेवळा (प्रतिनिधी):-  नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर रात्री 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्याचा गंभीर प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सुदैवाने घरातील दोघी महिलांना वेळीच जाग येऊन आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. हल्लेखोर दोन अज्ञात व्यक्ती नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आले होते. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी बिलसरीच्या बाटलीत पेट्रोल आणले होते. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन अज्ञात इसम घटनास्थळी आले. राऊळ गल्लीतील गणपती मंदिराजवळ दुचाकी उभी करून एक जण लोखंडी गेटवरून उडी मारत घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावून पसार झाल्याचा आरोप आहे. पेट्रोल टाकताच दरवाजाजवळील परद्याने त्वरित पेट घेतला आणि घरात धूर पसरला.


 आईला जाग येताच मोठा अनर्थ टळला :- यावेळी नंदकौर राऊळ यांना पेट्रोलचा वास आला आणि धूर व उष्णतेची जाणीव झाल्याने त्यांची झोपमोड झाली. त्यांनी तात्काळ आपली मुलगी किरण राऊळ यांना उठवले. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय त्यांना वाटला. मात्र दरवाजाजवळ आग लागलेली दिसताच त्यांनी पाणी आणून धाडसाने आग विझवली. वेळेवर घेतलेल्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.


 पेट्रोलची बाटली, माचिस पेटी घटनास्थळी आढळली :- आग विझवल्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता बाहेर पेट्रोलची रिकामी बिलसरी बाटली, पायरीवर माचिस पेटी व खाली आगकाडी पडलेली आढळून आली. यावरून हा प्रकार अपघात नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरडाओरड होताच गल्लीतील नागरिक घटनास्थळी जमा झाले.

 हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद :- रात्री पोलिस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीएसआय देवेंद्र राऊळ यांनी तात्काळ आपल्या विभागाला घटनेची माहिती दिली. राऊळ गल्लीतील तरुण आणि देवेंद्र राऊळ यांच्या मित्रांनी शेजारील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात रात्री 2.58 वाजता नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर दोन व्यक्ती आलेल्या दिसल्या. हा फुटेज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

 पोलिसात गुन्हा दाखल  :- या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाळपोळ करण्याचा प्रयत्न, जीवितास धोका निर्माण करणे व सार्वजनिक शांततेला बाधा आणणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागील हेतू व सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध अंगाने तपास करीत आहेत.

फॉरेसिक पथक घटनास्थळी दाखल:-घटनेची माहिती मिळताच फॉरेसिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

परिसरात भीतीचे वातावरण :- या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोपींना लवकरच अटक करणार:- सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शन नाखाली आरोपींचा शोध सुरू असून आरोपींना लवकरच अटक करणार असल्याची माहिती  पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी दिली असून त्यांना मदतनीस म्हणून सहायक फौंजदार निवृत्ती मोरे व दिनेश पाटील हे काम पाहत आहे.