साक्री शहरात चोरांचा धुमाकूळ


प्रतिनिधी साक्री;  संजय बच्छाव.

साक्री शहरात गेल्या काही दिवसापासून चोरांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा कोणताच धाक चोरट्यांना राहिला नसल्याने चोरट्यांची हिम्मत वाढली आहे. बुधवार( दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घालत शहरातील विविध ठिकाणी तब्बल पाच दुकानांना टारगेट करत पोलिसांपुढे एक आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे दोन दुकाने तर पोलिस ठाणे परिसरात होती. तर मार्केट मधील दुकानांना फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. एके ठिकाणी चोरटे दुचाकी ने जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने व्यावसायिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय पोलिसांच्या कारभारावर सर्वसामान्यांतून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महामार्गावरील कोर्टाजवळील प्रवीण भामरे यांच्या मालकीचे साईदीप टी अँड कोल्ड्रिंक्स हे दुकान फोडून चोरट्यांनी कोल्ड्रिंक्स चे बॉटल,बिस्किट, सिगारेट, अशा वस्तू चोरून तीन ते चार हजार रुपयांचा माल चोरून नेला. तर याच्या जवळच चहाच्या दुकानाचकुलूप तोडले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मार्केटकडे वळवला. लक्ष्मी रोडवरील चित्राई कृषी सेवा केंद्र या दुकानाची ही कुलूप तोडले. तर गुरुवारी सकाळी चोरीच्या सर्व घटनांवर उघडकीस आल्या. व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न व्यापाऱ्यांना सतावत आहे.

सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी उशिरापर्यंत घटनास्थळी भेट दिलेली नव्हती. उशिराने बोरसे गल्लीतील सैलानी चना फुटाणा या दुकानाला भेट देऊन आपले कार्य पार पाडले. एका ठिकाणी हे चोरटे दुचाकी वरून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान दुपारी उशिरापर्यंत चोरीच्या घटनेबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता.