प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव
जागतिक सायकल दिनानिमित्त लासलगाव पोलीस स्टेशन व लासलगाव सायकलिस्ट मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. लासलगाव पोलीस स्टेशन ते मंजुळा मंगल कार्यालय पॅलेसपर्यंत ही सायकल रॅली काढून जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक सायकल दिन दरवर्षी ३ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. सायकल चालविण्याचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २०१८ मध्ये ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला होता.
सायकल हे साधे, स्वस्त, विश्वासार्ह, स्वच्छ व पर्यावरणपूरक वाहतूक साधन असून नियमित सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, वजन नियंत्रणात राहते तसेच हृदयरोग व मधुमेहासारख्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. याशिवाय सायकलचा वापर वाढल्यास प्रदूषण व कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो.
यावेळी नागरिकांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकलचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. सायकल चालविणे हा केवळ व्यायाम नसून आरोग्यदायी व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील व पोलीस निरीक्षक किरण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लासलगाव मॉर्निंग ग्रुप, विविध गावांतील पोलीस पाटील, लासलगाव महाविद्यालयातील सायकलप्रेमी, पत्रकार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
