दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण ; धारणगावच्या भोंदू महाराजाला दि.२९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

 



प्रतिनिधी  :-  गणेश ठाकरे लासलगाव 

निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथे स्वतःला 'महाराज' म्हणवून घेत दैवी शक्तीच्या नावाखाली एका २८ वर्षीय विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१) याला लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, निफाड प्रथम वर्ग न्यायालयाने आरोपीला दि.२९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

       कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे पीडित महिला अस्वस्थ होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्या पालकांनी तिला धारणगाव येथील 'प्रतिगाणगापूर' मठात दर्शनासाठी नेले. तेथे महेशगिरी काकडे याने स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा बनाव करत महिलेला 'बाधा' असल्याचे सांगितले. धार्मिक विधीच्या बहाण्याने त्याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला आणि त्यानंतर तिला आक्षेपार्ह संदेश पाठवून मानसिक छळ सुरू केला. दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपीने पीडितेला नाशिक येथे बोलावले. तेथून तिला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेऊन "माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू माझा विरोध करू शकणार नाहीस," अशी भीती दाखवत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यावेळी आरोपीने तिचे विवस्त्र छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मोबाईलमधील संदेशही डिलीट केले. आरोपीच्या धमक्यांमुळे पीडित महिला आणि तिचे कुटुंब तक्रार करण्यास घाबरत होते. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला धीर देत पुढे येण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर पीडितेने लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.

      आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस.एस.सुक्रे यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता मनोज तोरणे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सात दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीतर्फे ॲड.योगेश तिडके यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दि.२९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी काही महिलांची फसवणूक किंवा लैंगिक शोषण झाले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीदरम्यान आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

• सदर भोंदू बाबाकडून कोणाचीही फसवणूक, आर्थिक गंडा किंवा छळ झाला असल्यास त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.- दिपक पाटील सहा.पोलिस निरीक्षक