प्रतिनिधी. - गणेश ठाकरे लासलगाव
नाशिक-संभाजीनगर महामार्गावर पिंपळसजवळ झालेल्या भीषण अपघातात आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेचा धसका घेत आजीचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
चांदोरी येथील पीयूष प्रताप गायकवाड (वय १७) हा विद्यार्थी शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) दुपारी सुमारे अडीच वाजता आपल्या मित्रासोबत निफाड येथील आयटीआयला मोटारसायकलने (एमएच १५/केएफ १७८९) जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या कारशी (एमएच १५/एससी ८५०९) त्यांची जोरदार धडक झाली. या अपघातात पीयूष व त्याचा मित्र करण भोर हे दोघे गंभीर जखमी झाले.जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना पीयूषचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या मागे आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेचा तीव्र धक्का बसल्याने पीयूषची आजी बब्याबाई माधवराव गायकवाड (वय ७०) यांचे रविवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी दुःखद निधन झाले. सलग तीन दिवसांत घडलेल्या या दोन दु:खद घटनांनी संपूर्ण चांदोरी परिसर हळहळला आहे.बब्याबाई गायकवाड या थोर तमाशा कलावंत व वगसम्राट स्व. माधवराव गायकवाड यांच्या धर्मपत्नी होत. त्यांच्या निधनानेही सांस्कृतिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.या दुहेरी दुःखद घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
