वार्ताहर गणेश ठाकरे लासलगाव
लासलगाव येथील संधान नगर कॉलनी रोडवर आज दुपारी एका भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ९ वर्षीय अर्णव संतोष यशवंते या बालकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याची आई किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आलेली आहे. लासलगाव पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादि मधील माहितीनुसार, लासलगाव येथील 'सेवंथ डे' ऍडव्हेंटिस्ट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षिका असलेल्या ज्योती संतोष यशवंते या दुपारी २:४५ च्या सुमारास आपला मुलगा अर्णव याला शाळेतून घेऊन स्कुटीने (क्र. MH-41 BA-1429) घरी जात होत्या. संधान नगर येथील कॉलनी रोडवर पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव हायवा डंपरने (क्र. MH-15 FV-9547) त्यांच्या स्कुटीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ज्योती यशवंते रस्त्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या ढिगावर फेकल्या गेल्या, तर अर्णव हा रस्त्यावर पडला. डंपरचे पुढचे चाक अर्णवच्या पोटावरून गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
याप्रकरणी मयत अर्णवचे आजोबा बाळकृष्ण यादव यशवंते (वय ६५) यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपर चालक सोमनाथ राजाराम कोल्हे (वय ३१, रा. सावरगाव, ता. येवला) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लासलगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
