प्रतिनिधी = गणेश ठाकरे लासलगाव
निफाड तालुक्यातील कोळगाव परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दिलीप रामभाऊ घोटेकर (वय ५६) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप घोटेकर हे गावाजवळ असलेल्या आपल्या शेतात मका पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक घोटेकर यांच्यावर झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यात त्यांच्या पायांना दोन ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. घोटेकर यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या घटनेपूर्वी त्याच मका पिकात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त केल्याचेही समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, तो आता थेट मानवी वस्तीच्या जवळ आणि शेतात हल्ले करू लागल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.
वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी
जखमी दिलीप घोटेकर यांना तातडीने नाशिक येथील शासकीय रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मका आणि ऊस पिकांच्या दाट क्षेत्रामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी कोळगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
