जिल्हा प्रतिनिधी
मलकापूर - पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी मागील आठवड्यात उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी “रन फॉर युनिटी” या विशेष धावण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आली. डॉ. खर्चे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व सांगत त्याग, एकता आणि समर्पणाच्या मूलभूत मूल्यांवर प्रकाश टाकला. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी एकतेसाठी वचनबद्धतेचे प्रतिज्ञान घेतले.
रासेयोच्या स्वयंसेवकांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेसमोर फुलांचे हार अर्पण केले व फटाक्यांच्या गजरात देशभक्तीची साक्ष देणाऱ्या जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी सरदार पटेल यांच्या कार्याची आणि त्यांच्या योगदानाची आठवण करून देत एकतेचे प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी घोषणांनी वातावरण भरून काढले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले, प्रा. राजेश सरोदे, प्रा. अंकुश नारखडे, प्रा. नितीन खर्चे तसेच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.