जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरातील रोहित्रातून सुमारे चार लाखांची तांब्याची तार आणि प्लेटा चोरी प्रकरणातील संशयितांच्या शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. दोन संशयितांकडून सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरातील मॉर्निसा बायो ऑर्गनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील रोहित्रातील सुमारे चार लाख १० हजार रुपयांची तांब्याची तार आणि प्लेटांची चोरी झाली होती. त्यासंदर्भात सचिन नागरे (रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील अहमद शेख इस्माईल (२७) आणि सलमान बेग हुसेन बेग (२६, दोन्ही रा. जहांगीरवाडी, चाळीसगाव) यांची माहिती तपासाधिकारी दीपक पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती दिली. त्याअनुषंगाने सहायक फौजदार शशिकांत महाजन, हवालदार योगेश बेलदार, नितीन वाल्हे, भरत गोराळकर, अमोल पाटील, नंदकिशोर महाजन, अजय पाटील, अमोल भोसले यांच्या नव्यानेच रचना करण्यात आलेल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासचक्रे फिरवत दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासादरम्यान संशयितांकडून चोरीस गेलेल्या मालापैकी एक लाख चार हजार ६९० रुपयांची १४५ फूट तार जप्त करण्यात आली. उर्वरित मुद्देमाल संशयितांकडून हस्तगत करण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. कोणी संशयास्पदरीत्या व्यक्ती फिरताना दिसून आल्यास त्यांची माहिती तत्काळ पोलीस ठाण्यात कळवावी. जेणेकरून चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याकामी पोलिसांना मदत होईल आणि चाळीसगाव शहर सुरक्षित राहील, असे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले आहे.