मलकापुर येथील सकल मराठा समाजाने मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आरक्षणाच्या मागणीसाठी ३० ऑक्टोबरपासून तहसील चौकात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावे, तसेच आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार मलकापूर यांना निवेदन देऊन साखळी उपोषण सुरू केले आहे..
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मनोज जरांगे-पाटील आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी देखील त्यांच्या समर्थनार्थ विविध मार्गाने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. त्या समर्थनार्थ मलकापुरात मराठा समाजबांधव सरसावले आहेत. मलकापूर शहरात साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून स्थानिक छत्रपती शिवाजी नगर येथून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढीत तहसीलदार मलकापूर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून मराठा समाजाचा कायदेशीर बाजुने लढा सुरू आहे. अनेक शांततेच्या मार्गाने मुक मोर्चे निघाले. तसेच मराठा समाजाला
आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील अनेक तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करून समाजासाठी आपल्या अनमोल जिवाचे बलीदान दिले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली येथे सकल मराठा समाजाची देशातील सर्वात बांधवांनी मोठी सभा झाली. मनोज जरांगे पाटील काही दिवसापूर्वी उपोषणाला बसले होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यावेळी त्यांचे उपोषण थांबवायला सांगून एका महिन्याचा वेळ मागीतला होता. परंतु अद्यापही आरक्षणा संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील अंतरवाली येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा म्हणून व मराठा समाजाला ओबीसी आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय मलकापूर समोर सकल मराठा समाजातील साखळी पध्दतीने उपोषण सुरू केले आहे.