उपराजधानीत ५० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय

 


नागपूर: केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नागपुरातील प्रादेशिक आयुर्वेदिक माता व बाल आरोग्य संशोधन संस्था, व्यंकटेश नगर, एनआयटी संकुल परिसरात अद्ययावत ५० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय होणार आहे.

नंदनवन परिसरातील या केंद्रात सध्या १६ खाटा आहेत. येथील बाह्यरुग्ण विभागात चांगला उपचार मिळत असल्याने मोठी गर्दी होते. या नवीन प्रकल्पामुळे नागपुरातील नागरिकांवर आयुर्वेदचे अद्ययावत उपचार माफक वा नि:शुल्क होतील. ५० खाटांच्या सहा माळयांच्या प्रस्तावित इमारतीसाठी सुमारे ६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे सादर झाला आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

आयुर्वेदिक माता व बाल आरोग्य संशोधन संस्थेची स्थापना १ जुलै १९७२ रोजी झाली होती. त्यावेळी ते हर्बल मेडिसिन युनिट आणि रिसर्च सेंटर म्हणून ओळखले जात होते. १९९९ मध्ये ते प्रादेशिक संशोधन केंद्र बनले. तेव्हापासून येथे फिरते वैद्यकीय सेवा, आदिवासींसाठी आरोग्य तपासणी, उपचार योजना व बाह्यरुग्णसेवा सुरू झाली. येथे आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या. नंतर सरकारने स्वतःच्या जमिनीवर सर्वसामान्यांसाठी संपूर्ण सुविधा असलेली इमारत तयार करून ही संस्था सुरू केली. १२ एप्रिल २०१६ रोजी संस्थेचे नामकरण झाले. प्रादेशिक आयुर्वेदिक माता व बाल आरोग्य संशोधन संस्था या नावाने नवी ओळख मिळाली.

                                    पाच लाख रुग्णांवर उपचार

नंदनवनमधील या संस्थेत मध्य भारतातील रुग्ण उपचाराला येतात. येथील बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार झाले आहेत.