पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाने तीन गावठी पिस्तूल पकडले आहेत. याप्रकरणी सुनील बाळासाहेब खेंगरे आणि अभिजीत अशोक घेवारे यांना खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून एक लाख वीस हजार सहाशे रुपयांचे तीन देशी बनावटीचे पिस्तूले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरात सराईत गुन्हेगार आले असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी आशिष बोडके आणि प्रदीप गोडांबे यांना मिळाली. त्या ठिकाणाहून आरोपी सुनील खेंगरे आणि अभिजीत घेवारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तीन देशी बनावटीचे पिस्तुलं आणि तीन जिवंत काडतुसं आढळले आहे. आरोपी सुनील खेंगरे याच्यावर दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे. तीन पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे कशासाठी बाळगले यासंबंधी पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीमने केले आहे.