तालुक्यात पाच गावांचा टँकरसाठी प्रस्ताव



अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी

 ४ मे मालेगाव : तालुक्यात उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. कजवाडे, सावकारवाडी, वऱ्हाणे या तीन गावांसह वऱ्हाणेपाडा येथे सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ आता नगाव, झाडी, एरंडगाव जळगाव, निंबायती, ज्वार्डी बुटूक, कंधाने या पाच गावांनी टँकर मागणी प्रस्ताव दाखल केले आहेत. तहसील व पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर या गावांना टँकर सुरू केले जाणार आहे. परिणामी टँकरग्रस्त गावांची संख्या नऊ होणार आहे.

       तालुक्यात टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या चार टँकरला जीपीएस बसविण्यात आले आहेत, जीपीएस नसताना टँकर फेऱ्या केल्यास अशा या बनावट ठरविल्या जातील, जीपीएस प्रणालीद्वारेच टँकर फेऱ्यांची नोंद घेण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. सध्या कजवाडे, सावकारवाडी, वहाणे या तीन गावांसह वहाणेपाडा वस्तीला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरु आहे. पाणी वितरण प्रक्रियेत पारदर्शीपणा ठेवण्यासाठी पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरला जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे टँकरचे निश्चित लोकेशन यंत्रणेला प्राप्त होते. टँकर कुठून भरले, कुठल्या मार्गाने गेले, कुठे पोहचले. याची अचूक माहिती ऑनलाईन मिळणार आहे. यामुळे बनावट फेऱ्यांना पायबंद बसणार आहे.