तळा तालुक्यातील कोणथरे गावात विधवा प्रथा बंद...


प्रतिनिधी - रमेश करंजे (तळा)

    ग्रामविकास मंडळ कोणथरे, मुंबईकर मंडळ कोणथरे, ग्रामस्थ मंडळ कोणथरे व महिला मंडळ कोणथरे यांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ एप्रिल २०२३ रोजी काळभैरव मंदिर सभागृह, मौजे कोणथरे या ठिकाणी संपन्न झाली. सामाजिक सुधारणांचा ध्यास घेतलेल्या तळा तालुक्यातील या लहानशा खेड्यात सामाजिक कार्यातील विधवांचे स्थान सौभाग्यवतींप्रमाणे संपन्न असावे आणि खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता जोपासली जावी यासाठी विधवा प्रथेच्या अनुषंगाने निर्माण झालेले गैरसमज व रूढी बंद करण्याचा क्रांतिकारी,धाडसी,ऐतिहासिक असा निर्णय एकमताने घेण्यात आले.

त्यामुळे विधवा स्त्रीचे जीवन अधिक स्वायत्त व सुंदर होईल अशी आशा वाटते. याप्रसंगी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष लिलाधर बाईत, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाईत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष किसन बाईत व महिला मंडळाच्या अध्यक्षा हर्षाली आडीत तसेच गावातील जेष्ठ सभासद साधुराम पिंपळे, चंद्रकांत कोतवाल (निवृत्त शिक्षणाधिकारी) उपस्थित होते. उत्तम परंपरांचे वहन आणि समाजविघातक प्रथांचे उच्चाटन याकरीता कोणथरे गाव नेहमीच उत्तम कार्य करीत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.त्यामुळे तालुक्यातून कोणथरे गावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.