आंतरजिल्हा बदली झालेले पालघर येथील ४७८ शिक्षक कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत


सतीश कोळी,खुलताबाद शहर प्रतिनिधी

दि.११ मे २०२३

    आंतरजिल्हा बदली होऊनही पालघर जिल्हा परिषदेच्या आडमुठ्या धोरणामुळे ३३ जिल्ह्यातील ४७८ शिक्षक अजूनही कार्यमुक्त होऊ शकले नाहीत. पालघर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिला असल्याची माहिती शिक्षक समिती चे राज्य नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि पालघर जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष साबळे यांनी दिली आहे.

   २०१७ पासून संगणकीय प्रणालीने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली स्व जिल्ह्यात केल्या जातात. स्व जिल्ह्यात जागा नसल्यास नजीकच्या जिल्ह्यात स्वेच्छेने बदली मागता येते. आतापर्यंत आंतरजिल्हा बदलीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक रिक्त असल्याने शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली होऊ नये कार्यमुक्त न करण्याची भूमिका स्थानिक प्रशासनाने घेतली होती.  आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना अनेक जिल्हा परिषदांनी वेळोवेळी कार्यमुक्त केले. राज्याच्या ग्रामविकास विभागाने फेब्रुवारी आणि मे महिन्यात आदेश देऊन सुद्धा अनेक जिल्हा परिषदा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करत नव्हते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याच्या जिल्हा परिषदेच्या संबंधाने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतरच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्हा परिषदेने शिक्षकांना कार्यमुक्त केले. 

   परंतु अजूनही पालघर जिल्ह्यातील ४७८ शिक्षक व जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्तीची वाट पाहत आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्देश देऊनही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने १५ मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. 

   राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय कोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यातून ३३ जिल्ह्यात जाणारे ४७८ शिक्षक पुढील प्रमाणे आहेत.

पुणे (१४), सातारा (४२), सांगली (४०), सोलापूर (१२), कोल्हापूर (१०), नाशिक (३७), धुळे (०७), जळगाव (१३), नंदुरबार (२५), अहमदनगर (१०), अमरावती (०६), अकोला (१०), यवतमाळ (४६), वाशिम (१२), बुलढाणा (२१), नागपूर (११), वर्धा (०१), गोंदिया (०८), गडचिरोली (०१), चंद्रपूर (०६), भंडारा (०३), सिंधुदुर्ग (०२), रत्नागिरी (०१), ठाणे (३३), रायगड (०७), संभाजीनगर-औरंगाबाद (२८), लातूर (०२), बीड (०३), जालना (४१), हिंगोली (०९), नांदेड (०९), परभणी (०७), धाराशिव-उस्मानाबाद  (०१)