खुलताबाद प्रतिनिधी:सतीश कोळी
नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन राज्य कार्यकारीणीची सभा पुणे येथील शिक्षक भवनमध्ये संपन्न झाली. ऑनलाईन कामे करण्यासाठी शिक्षकांचा विरोध नाही मात्र शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन न देता शिक्षकाना ऑनलाईन कामासाठी वेठीस धरणे हा अन्याय असे वक्तव्य राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थ्याची व शिक्षकांनी बीओटी अप्लिकेशन प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवण्यासाठी शासनाने पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाचीच जबाबदारी असल्याचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन राज्य कार्यकारीणीच्या सभेत सांगितले. त्यावेळी व्यासपीठावर शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर,ज्येष्ठ मार्गदर्शक काळूजी बोरसे,सहसचिव दादा जांभवडेकर,वर्षा केनवडे उपस्थित होते.
यावेळी या सभेत शिक्षकांच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच वेंगुर्ला येथील त्रैवार्षिक महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षकानी जे योगदान दिले त्याबद्दल सर्व शिक्षकाना धन्यवाद देण्यात आले. संगणकीय ऑनलाईन बदल्यात सहाव्या टप्प्यातील बदली निकषामुळे सेवा ज्येष्ठ शिक्षक आणि महिला शिक्षिकाना अवघड क्षेत्रात असलेल्या शाळांमध्ये बदल्या होऊन जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या 15/2/2018 च्या शासन निर्णयानुसार महिला शिक्षकांची अवघड क्षेत्रातील शाळेत बदल्या करता येत नाहीत म्हणून सहाव्या टप्प्यातील बदल्या रद्द कराव्यात अशी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांनी ठराव रुपात मागणी केली.
राज्य कार्यकारीणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून जी नावे देण्यात आली आहेत त्यातून पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारीणी गठीत करण्याचे अधिकार, शिक्षक नेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, व राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर याना देण्यात आले.ज्या जिल्ह्य व तालुका शाखांची मुदत संपली आहे त्यानी 30 एप्रिल पर्यंत विषय नियामक समित्या गठीत करुन लोकशाही पध्दतीनुसार नूतन पदाधिकारी निवडून कार्यकारीणी गठीत कराव्यात अशा लेखी सूचना देण्यात याव्यात असे ठरविण्यात आले.
संप काळातील वेतन काढण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे.आज ना उद्या नक्कीच ते आदेश पारीत निघेल,असा विश्वास राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी व्यक्त केला.
ज्या जिल्हा शाखानी अद्याप आर्थिक हिशोब पुर्ण केलेले नाहीत त्यानी ते त्वरित पुर्ण करुन द्यावेत म्हणजे त्रैवार्षिक अधिवेशनाचा संपुर्ण जमाखर्च पुढिल सभेत सादर करुन मंजूरी घेता येईल असे राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यानी सूचना दिल्याचे संभाजीनगर शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले. यावेळी विजय साळकर,रंजित राठोड, नितीन नवले,शामभाऊ राजपूतकडूबा साळवे,बबन चव्हाण, कैलास ढेपले,मंगला मदने,रऊप पठाणसह शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.