रोहयो’ची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर



प्रतिनिधी, काकडे सदाशिव

           रोजगार हमीच्या कामाचे (MNREGA Work) नियंत्रण ठेवण्याचे काम हे कार्यक्रम अधिकारी म्हणून तहसीलदार व सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून बीडीओकडे (गटविकास अधिकारी) असते. जी कामे सुरू आहेत त्याचे मस्टर ग्रामरोजगार (Rural Employment) सेवकामार्फत ग्रामसेवक काढतात. त्यावर ग्रामसेवकांच्या सह्या करून ते मस्टर मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवले जाते.

त्यानुसार मजुरी मिळते. मात्र मध्यंतरी त्या मस्टरवरील ग्रामसेवकांची सही वगळण्याचे परिपत्रक शासनाने काढल्यामुळे आता ते मस्टर थेट मंजुरीसाठी बीडीओंकडे येत आहे.


           मस्टरची खातरजमा करणारी गाव पातळीवर यंत्रणाच न राहिल्यामुळे त्यात काही काळाबाजार झाला तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित करून राज्यातील बीडीओंनीही मस्टरवर सही करण्यावर बहिष्कार टाकला आहे.  बीडीओंच्या या निर्णयामुळे गेल्या महिन्यापासून लाखो मजुरांची मजुरी अडकली आहे. त्यामुळे मजूर कामावर येत नसल्याने ‘रोहयो’ची कामे राज्यभर ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.