इगतपुरी तालुक्याच्या ३१८ शाळा झाल्यात तंबाखूमुक्त



महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र शासनाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्वच शाळा या तंबाखूमुक्त शाळा करण्यात याव्यात आणि यासाठी शासनाने पारित केलेले ९ निकष शाळा स्तरावर पूर्ण करणे गरजेचे आहेत. यानुसार राज्यातील सर्वच शाळा प्रयत्न करीत असून नाशिक जिल्हा ही यात अग्रेसर आहे. नाशिक जिल्ह्यात आत्ता पर्यंत ६ तालुके हे १००% तंबाखूमुक्त शाळांचे तालुके यापूर्वीच घोषित झालेले आहेत. 

आता इगतपुरी तालुक्यातील शाळांनीही यात महत्त्वपूर्ण कामगिरी करून इगतपुरी तालुक्यातील सर्वच ३१८ शाळा ह्या ९ निकष पूर्ण करून तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित झालेल्या आहेत. सदर तालुका तंबाखूमुक्त- शाळांचा तालुका घोषित करण्यासाठी आज दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती इगतपुरी येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्याच्या गटविकास अधिकारी डॉ. लता पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील, तंबाखू नियंत्रण कक्षाच्या डॉ. शिल्पा बांगर, सलाम मुंबई फाउंडेशन चे श्री दीपक पाटील आणि विस्तार अधिकारी श्री आर.पी अहिरे आणि श्री एस. आर. नेरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यश गाठणे जसे अवघड असते तसेच यश टिकून ठेवणे त्याहीपेक्षा अवघड असते परंतु इगतपुरी शिक्षण विभाग हे यश टिकवून ठेवले आणि सर्व निकष शाळा स्तरावर पूर्ण ठेवून भावी पिढी ही तंबाखू मुक्त व व्यसनमुक्त ठेवण्यास इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षण विभाग कटिबध्द असेल असे मत यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री निलेश पाटील यांनी मांडले. याप्रसंगी तालुक्याचे प्रतिनिधी करण्यास १०८ मुख्याध्यापक तसेच सर्व विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख उपस्थित होते. सर्व शाळांना सलाम मुंबई फाउंडेशन, एव्हरेस्ट फाउंडेशन आणि तंबाखू नियंत्रण कक्ष, आरोग्य विभागा नाशिक यांच्या तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर तालुका तंबाखू मुक्त करण्यासाठी शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन, एव्हरेस्ट फाउंडेशन यांनी विशेष प्रयत्न केले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता तालुक्याचे विस्तार अधिकारी श्री एस आर नेरे, श्री. ए के मुंडे, श्री आर. एन तायडे, आणि  तज्ञ मार्गदर्शक शिक्षक श्री संजय येशि,अजय चव्हाण, गणेश कतकडे आणि सौ. मनीषा वाळवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले