अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी
(२५ एप्रिल मालेगाव) शहर व तालुक्यातील विकासकामांच्या देखणेपणात मालेगाव क्रेडाई' ची भूमिका महत्त्वाची आहे. आगामी वर्षात विकासकामातून सुंदर मालेगाव शहर साकारण्यात येणार आहे. या स्वप्नपूर्तीसाठी क्रेडाईच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
बालाजी लॉन्स येथे झालेल्या मालेगाव क्रेडाई पदग्रहण सोहळ्यात मंत्री भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रमोद खैरनार होते. यावेळी मालेगाव क्रेडाईच्या अध्यक्षपदी विवेक देवरे यांची निवड करण्यात आली.
मालेगाव क्रेडाई २०२३-२५ वर्षाकरिता पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विवेक देवरे, राज्य उपाध्यक्ष सुनील कोतवाल, राज्य सहसचिव शांताराम पाटील, शहर विकासक व ऑडिट समन्वयक राजेंद्र भामरे यांनी मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष रवींद्र शेलार यांनी कार्यपूर्ती अहवाल सादर केला.
या पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांत अध्यक्ष विवेक देवरे, सचिव विजय सोनवणे, उपाध्यक्ष देवराम हिरे व दिनेश जैन, खजिनदार केतन भामरे यासह क्रियाशील पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष कुणाल पाटील, मालेगाव क्रेडाईचे माजी अध्यक्ष अजय बच्छाव, विजय पोफळे, दीपक मोदी, युवा विंगचे अध्यक्ष उदित हिरे, महिला प्रतिनिधी अक्षदा कलंत्री यांचेसह शहर व तालुक्यातील क्रेडाईचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील छाजेड, मधुकर काबरा यांनी तर सचिव विजय सोनवणे यांनी आभार मानले.