म. ज्योतिबा फुले जयंती विशेष

 


क्रांतीज्योती महात्मा आम्हाला माफ करा........

            शाहू, फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र असा सातत्याने भाषणात उल्लेख करणारे आम्ही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जयंती - पुण्यतिथी उत्सव साजरा करताना मात्र क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतोत. ज्या महापुरुषाचा अनुयायी वर्ग जितका मोठा तितकी त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते, हे सामाजिक कटू वास्तव आता सर्वश्रुत झाले आहे परंतु अनेक महापुरुषांवरती या संकुचित विचारांमुळे अन्याय होतो. क्रांतीज्योती महात्मा फुले याच गटात मोडणारे ! ज्यांनी समाजातील उपेक्षितांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी सपत्नीक सामाजिक विरोध पत्करला, शेण, चिखल, दगड-धोंडे झेलले त्यांच्या जयंतीदिनी तो त्याग आम्ही विसरत चाललो आहोत, याची प्रकर्षाने जाणीव होते. 

    प्रत्येकच महापुरुषाच्या सामाजिक कार्याचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने जयंती उत्सव उत्साहात साजरा झालाच पाहिजे परंतु दुर्दैवाने जातीच्या आधारावर महापुरुषांची केली जाणारी विभागणी अनेक महापुरुषांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक व काळाच्या कितीतरी पट पुढे घेऊन जाणारे असून देखील केवळ महापुरुषांची जात शोधल्यामुळे त्यांच्या विचारांचे वारसदार निर्माण होऊ शकत नाहीत, ही बाब संपूर्ण समाजासाठी चिंतनीय आहे. महापुरुषांनी दिलेले सामाजिक योगदान हे केवळ एका जातीपुरते मर्यादित असत नाही याची जाणीव आम्हाला होताना दिसत नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय दूर करण्यासाठी ब्रिटिश सरकार समोर शेतकऱ्यांचा आसूड ओढला. हा केवळ एका विशिष्ट जातीपुरता मर्यादित नव्हता. अविद्येमुळे माणसाच्या आयुष्यामध्ये होणारी वाताहात दूर करण्यासाठी घरोघरी ज्ञानाचा दिवा लागला पाहिजे, यासाठी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचे महत कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले, ते केवळ एका विशिष्ट वर्गासाठी नव्हते. मनुष्य 'जातीने' श्रेष्ठ ठरत नसुन तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. ईश्वर एक असुन तो सर्वव्यापी निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे. सर्व मनुष्य व मनुष्येत्तर प्राणी त्याची लेकरे आहेत. 


    हा वास्तव विचार सन १८ व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम करणारे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, हे पुढील पिढीला कोण सांगणार ? अजून ४ वर्षांनी म्हणजे २०२७ साली मोठ्या थाटामाटात समाज व सरकारकडून द्विशतक जयंती उत्सव साजरा करण्यात येईल परंतु आजवर केलेल्या उपेक्षेच काय ? स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र दिसून येते परंतु वैचारिक पातळीवर अजूनही आम्ही बाल्यावस्थेतच असल्याचे चित्र अशा घटनांमधून समोर येते. महापुरुषांकडे पाहताना एका विशिष्ट जातीच्या चष्म्यातून पाहणे म्हणजे त्यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याला संकुचित केल्यासारखे होते परंतु आम्ही अजूनही तो विचारांचा कोतेपणा घेऊनच पुढे जात आहोत. 

    यामुळे निश्चितच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर आपली काया झिजवली त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. समाज म्हणून आपण अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. वेळीच महापुरुषांना समजून घेतले तर ठीक अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे शाहू आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात क्रांतीज्योती महात्मा फुले देखील आहेत याची जाणीव ठेवावी, एवढीच माफक अपेक्षा ! प्रा. डॉ. गौरव गोविंदराव जेवळीकर