येवला दिनांक 22:- (वार्ताहर पंकज गायकवाड)
आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वच क्षेत्रात नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा दिसून येत आहे. कृषी क्षेत्रातही वेगवेगळे प्रयोग राबवून प्रयोगशील शेतकरी आपले वेगळेपण दाखवून देत आहेत. विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच कृषीविषयक ज्ञान मिळावे यासाठी फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया अर्थात 'फाली' या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
वर्हे दारणा येथील श्रीमती अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी ईश्वरी बोडके ही यावर्षीच्या 'फाली' तर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची मानकरी ठरली आहे .तिला फाली संस्थेतर्फे पुढील चार वर्षांच्या शिक्षणासाठी एकूण एक लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. 2022 सालापासून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू केलेल्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत फालीचे शिक्षण देणाऱ्या 155 शाळांमधून दहा विद्यार्थ्यांची गुणवत्ता निकषावर मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. या विद्यार्थिनीला फाली संस्थेतर्फे नियुक्त केलेल्या मार्गदर्शिका सुरेखा वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.