प्रतिनिधि - साहिल खान लोणार
लोणार :- दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी जागतिक जिल्हा ग्रंथपाल, सतीश श.जाधव यांच्या आदेशान्वये ग्रंथदिन निमित्त डॉ.अल्लामा इक्बाल उर्दू सार्वजनिक वाचनालय, लोणार येथे ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष नूरमोहम्मद अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे संचालक मंडळातील सदस्य अताऊल्लाखान युसुफखान, डॉ. बाजिकअली सिद्दिकी, इमरानखान करामतखान, कर्मचारी सय्यद अख्तर, ग्रंथपाल सय्यद सत्तार सह वाचक मंडळी, लेखक, विद्यार्थी आणि शिक्षक यांची उपस्थिती होती.
वाचन प्रकाशन आणि कॉपीराईट विषयी कायद्याची लोकांना माहिती व्हावी तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. असे मार्गदर्शन वाचनालयाचे सचिव डॉ. सय्यद ताहेर सय्यद गुलाब यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात नूरमोहम्मद यांनी माहिती देतांना या दिवसाची आंतरराष्ट्रीय भूमिका स्पष्ट केली व सांगितले की, हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जातो तर स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.
वाचनालयाचे ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक शेख इलाही बखश यांनी सांगितले की, दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट संकल्पना असते. ज्ञान देण्याबरोबर पुस्तकांमध्ये मनोरंजन करण्याची अद्वितीय क्षमता आहे. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात यात शंकाच नाही, परंतु पुस्तकांमध्ये बर्याच मनोरंजक गोष्टी देखील वाचायला मिळतात. ती आपले मनोरंजन देखील करतात. आपली भाषा देखील पुस्तकाद्वारे सुधरते.
यावेळी डॉ. बाजिकअली सिद्दिकी यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.