‘माळढोक’ने पार केला मैलाचा दगड; जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात दोन पिल्लांचा जन्म

  


    नागपूर : नामशेष होण्याच्या मार्गावरील माळढोकने त्याच्या राज्यात म्हणजेच राजस्थानमधील जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात पहिल्यांदाच पिलांना जन्म दिला आहे. भारतात हे पक्षी १५० च्या संख्येत असून त्यांना वाचवण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्राची मदत घेतली जात आहे.

    बंदिवासात पाळलेल्या माळढोकचे पिल्लू शनिवारी पहिल्यांदाच जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात उबवण्यात आले. भारतात हा पक्षी नामशेषाच्या मार्गावर असून १५० पैकी सुमारे ९० पक्षी केवळ दोन संरक्षित क्षेत्रात आढळतात. गेल्या तीन दशकांत या पक्ष्याची लोकसंख्या ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे. फेब्रुवारीमध्ये दोन कृत्रिमरित्या उबवलेल्या पक्ष्यांचे मिलन झाले होते आणि मादीने सहा मार्च रोजी अंडी घातली होती. शनिवारी या अंड्यातून निरोगी पिल्लांचा जन्म झाला.

पहिल्यांदाच हे पुनरुत्पादन झाले असून माळढोकची संख्या सुधारण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. २१ दिवसांच्या उष्मायनानंतर अंडी उबवण्याचे काम झाले. अंडी उबदार ठेवण्यासाठी आणि योग्य आर्द्रतेच्या पातळीखाली ठेवण्यासाठी ‘इनक्यूबेटर’मध्ये ठेवण्यात आले होते. बंदिस्त पक्ष्यांची पिल्ले केंद्राला पक्ष्यांची लोकसंख्या वाढवण्यास मदत करतील जे नंतर जंगलात सोडले जाऊ शकतात. माळढोक राजस्थानचा राज्यपक्षी असून तो गोदावन म्हणूनही ओळखला जातो. आययूसीएनच्या यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात म्हणून सूचीबद्ध आहे आणि त्याला भारताच्या वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत सर्वोच्च स्तरावरील संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.